logo

खळबळ : एनआयए अधिकारी सांगून पिस्तुलाच्या धाकावर अभियंता तरुणीचे अपहरण ; बंटी-बबली गजाआड , मागत होते 30 लाख

नागपूर : एनआयए अधिकारी असल्याचे सांगून पिस्तुलाच्या धाकावर एका बंटी बबलीने एका आयटी अभियंता तरुणीचे सिनेस्टाईल अपहरण करून 30 लाखाची खंडणी मागितल्याचे खळबळजनक प्रकरण उजेडात आले आहे.
शहर गुन्हेशाखा पोलिसांनी आरोपी बंटी बबलीला अटक केली असून त्यांचा 27 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे.
स्वप्नील दिलीप मरसकोल्हे (25) आणि चेतना विजय बुरडे (23), अशी आरोपींची नावे असून ते भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते गेल्या दोन वर्षांपासून एमआयडीसी भागात भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते आणि नोकरीच्या शोधार्थ होते.
आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी क्राईम वेबसिरीज पाहून त्यांनी कुण्या सडपातळ व्यक्तीच्या अपहरणाची योजना आखली होती. ते सावजाच्या शोधार्थ होते.
अपहृत तरुणी ही हिंगणा टी पॉईंट येथील एका आयटी कंपनीत कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. ती 20 मार्च रोजी रात्री आपली ड्युटी संपवून आपल्या
ॲक्टीव्हाने प्रतापनगर भागातील आपल्या घराकडे परत जाण्यास निघाली होती. ती घरी परत न आल्याने तिच्या वडीलाने राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
प्रत्यक्षात बंटी-बबलीने एनआयएचे अधिकारी असल्याचे सांगून पिस्तुलाच्या धाकावर तिचे वाहनासह अपहरण केले. तिच्याजवळील 62 हजार 500 रुपये किंमतीचे दागिने, मोबाईल हिसकावून घेतले होते.
21 मार्च रोजी दुपारच्या वेळी अपहरणकर्त्याने अपहृत तरुणीचा घरी फोन करून तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे, ती जिवंत पाहिजे असल्यास 30 हजार रुपये तयार ठेवा, पैसे कोठे आणावयाचे आहे ते शनिवारी सांगतो, असे सांगितले होते. त्याने हा फोन भोजपुरी भाषेत केला होता. त्याने गुगल ट्रान्सलेटरचा वापर करून हिंदीचे भोजपुरीत रूपांतर केले होते.
22 रोजी सायंकाळच्या वेळी खुद्द अपहृत तरुणीने आपल्या वडिलाला फोन केला होता. मला एका ठिकाणी बांधून ठेवलेले आहे. ठिकाण माहीत नाही, माझी सुटका करा, असे रडत सांगितले होते.
या तरुणीने आपला मोबाईल लॅपटॉपशी संलग्न केला होता. प्रतापनगर आणि गुन्हेशाखा पोलिसांनी सीसीटीव्ही आणि टॉवर लोकेशनचा आधार घेत तरुणीचा शोध घेतला. पोलिसांनी एमआयडीसी महाजनवाडी येथील एका चाळीतून तिची सुटका केली आणि दोन्ही अपहरणकर्त्यांना भा. दं. वि.च्या 364 ए, 392, 34 कलमानव्ये अटक केली.

64
3892 views